चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील अकुलखेडा येथील माजी सरपंचाच्या घरासमोर उभी दुचाकी ट्रॅक्टर नेण्यास अडसर ठरत असल्याच्या रागातून हाणामारी झाल्याची घटना घडली. ट्रॅक्टर चालकासह त्याच्या कुटूंबीयांनी घरात घूसून मारहाण केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

चोपडा तालूक्यातील अकुलखेडा येथील शेतकरी आनंद लोटन चौधरी (वय-६६) हे गावचे माजी सरपंच आणि प्रतिष्ठीत ग्रामस्थ आहे. पत्नी मिनाबाई, मुलगा योगेश, अनंत अशांसह एकत्र कुटूंबात ते वास्तव्यास असून दोन्ही मुलं उच्च शिक्षीत असल्याने आधुनिक शेती करतात. त्यांच्याच घरासमोर रविंद्र पांडू पाटील यांचे घर असून त्यांनी घराशेजारीच ट्रॅक्टर लावण्याचे शेड तयार केले आहे. बुधवार दि. २६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास माजी सरपंच आनंद लोटन चौधरी यांच्या दाराशी दुचाकी उभी होती. त्याच वेळेस रविंद्र पाटिल हा ट्रॅक्टर(एम.एच.१९.सीसी ६१५) घेवुन गल्लीत आला.
दुचाकी काढण्यावरुन घराकडे पाहुन शिवीगाळ करत असल्याने, त्यास आनंद चौधरी यांनी, वाहन काढण्यासाठी चावी आणतो. थांब, असे सांगीतल्याचा राग येवून मिलींद रविंद्र पाटील, सागर रविंद्र पाटील अशा देाघा भावांनी विनाकारण शिवीगाळ करून घरात शिरकाव केला. आनंद चौधरी, मिनाबाई या वयोवृद्ध दाम्पत्यासह त्यांचा मुलगा योगेश यास बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत आनंद चौधरी यांच्या बरगड्यांना जबर दुखापत होवुन हात मुरगळला असून, योगेश चौधरी यांच्या हाताला दुखापत करण्यात आली. जखमींना ग्रामस्थांनी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींचा जबाब घेतल्यानंतर चोपडा पेालिसांत दिलीप रविंद्र पाटील, सागर रविंद्र पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक एम.डी. साळवे करत आहेत.









