एरंडोल तालुक्यातील बंधाऱ्याजवळची घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – मित्रांसोबत सहलीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या जळगाव येथील एका २२ वर्षीय तरुणाचा एरंडोल तालुक्यातील बंधाऱ्याजवळ गिरणा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. आशुतोष दिलीपकुमार जोशी (वय २२, रा. गणेश नगर/सिंधी कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे.


आशुतोष रविवारी ८ फेब्रुवारी सकाळी आपले मित्र सागर कटारिया, सोमय्या जैस्वाल आणि राहुल चव्हाण यांच्यासोबत एरंडोल तालुक्यातील कांताई बंधारा परिसरात फिरण्यासाठी गेला होता. हे सर्व मित्र बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला हात-पाय धुण्यासाठी उतरले असता, अचानक सोमय्या आणि आशुतोष यांचा पाय घसरला. दोघेही पाण्यात पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक मच्छिमारांनी आणि तरुणांनी प्रसंगावधान राखत पाण्यात उड्या घेतल्या. त्यांनी सोमय्या जैस्वाल याला सुखरूप बाहेर काढले.
मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आशुतोष प्रवाहात वाहून गेला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर स्थानिकांनी त्याला शोधून काढले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्याला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आशुतोषची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत विदारक आहे. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्याच्या आजीने (आईची आई) त्याला अत्यंत कष्टाने मोठे केले होते.
धार्मिक प्रवृत्तीचा आशुतोष भजन-कीर्तनाच्या माध्यमातून समाजकार्यातही सक्रिय होता. घटनेच्या दिवशी मामांनी त्याला ‘वास्तुशांती’ला येण्यास सांगितले होते, मात्र मित्रांचा आग्रह तो टाळू शकला नाही आणि ही सहल त्याची शेवटची सहल ठरली.









