जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हयाला वरदान ठरणाऱ्या गिरणा धरणात आज शुक्रवारी दि. ९ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाणीसाठा ४१.७२ टक्के झाला आहे. वरुन पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. गिरणा धरणात पाण्याचा साठा वाढत असल्याने गिरणा काठावरील जनतेत आनंदाचे वातावरण दिसत आहे.
गिरणा धरणातून चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव व जळगाव या तालुक्यांमधील १७५ गावांना पाणीपुरवठा होतो. सोबतच चाळीसगाव शहर, मालेगाव, नांदगाव शहराला पाणीपुरवठा केला जातो. चाळीसगाव व मालेगाव औद्योगिक वसाहतींची चाकेही गिरणा धरणाच्या पाणीपुरवठ्यावरच फिरतात. एकूण १८२ पाणीपुरवठा योजनांना गिरणा धरणामुळेच संजीवनी मिळते. आवर्तनाचे पाणी कानळदा गावापर्यंत पोहोचते. गिरणा धरणाची एकूण जलसाठवण क्षमता २१ हजार ५०० दलघफू असून, या महाकाय जलस्रोतातून १ लाख ४१ हजार ३६४ एकर क्षेत्र ओलिताखाली येते. उपयुक्त जलसाठा १८ हजार ५०० दलघफू आहे.