पुणे ( प्रतिनिधी ) – शरद पवार आता अर्धसत्य सांगत आहेत, पूर्ण सत्य सांगावं, भाजप आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेबाबत सर्व चर्चा केली होती, दिल्लीत भाजपचे नेते आणि शरद पवार यांच्या बैठका झाल्या, असेही गिरीश महाजन म्हणाले आहेत. कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं हेही ठरलं होतं, पण काँग्रेस शिवसेनेसोबत यायला तयार झाली तेव्हा शरद पवारांनी आपला शब्द फिरवला, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.
शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीवरून राज्यात पुन्हा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. यावर महाविकास आघाडीकडून फक्त संजय राऊत बोलले असले तरी भाजप नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, भाजप नेते गिरीश महाजन यांनी तर भाजप आणि राष्ट्रवीत काय बोलणी झाली? सत्ता स्थापनेसाठी काय फॉर्म्युला ठरला होता? पवारांनी शब्द का फिरवला? अशा अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
गिरीश महाजन यांना अजित पवार आणि फडणवीस यांच्या काय चर्चा झाली? असे विचारले असता, पहाटेच्या शपथविधी वेळी मीही सोबत होतो, पण त्यावेळी अजित पवार आणि फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहिती नाही, असे उत्तर गिरीश महाजन यांनी दिले आहे. दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही हा शपथविधी फडणवीस आणि अजित पवारांची पाठ सोडत नाही, पुन्हा एकदा त्यावरून अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे भाजपच्या आरोपांना शरद पवार काय उत्तर देणार? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.