चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी):- घोड्याने जोरात लाथ मारल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथे घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संदीप एकनाथ राठोड (वय ३०, रा. करगाव, ता. चाळीसगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. संदीप यांना घोड्याने लाथ मारल्यामुळे त्यांच्या शरीराला गंभीर इजा झाली होती. ही घटना घडल्यानंतर त्यांचे नातेवाईक चेतन एकनाथ राठोड यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी चाळीसगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. हॉस्पिटलमध्ये संदीप यांच्यावर डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू होते. मात्र, दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. एका तरुण शेतकऱ्याचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने करगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेंळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय महाजन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.








