अमळनेर पोलीस स्टेशनची कामगीरी
अमळनेर (प्रतिनिधी) : ट्रकमध्ये बेकायदेशीररित्या १२ घोडे व एक शिंगरू वाहतूक करणाऱ्या दोघांना अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांकडून घोड्यांसह ट्रक असा एकूण ४ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काही नागरिकांनी प्रताप महाविद्यालयाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाजवळ पाण्याच्या टाकीजवळ दि. १८ मार्च रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास एक ट्रक अडवून ठेवला आहे अशी माहिती गोपनीय अंमलदार सिद्धांत शिसोदे याना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांना कळवल्यावर दोघेही घटनास्थळी पोहचले. ट्रक (एमएच १९ बी एम ००२२) चा चालक अजय भाईदास भिल (वय २२ रा. बोरगाव) याला ट्रक मधील घोडे वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याने परवाना नाही असे सांगितले. ट्रक मधील १२ घोडे आणि शिंगरू हे शकील कासम खाटीक (वय ३६ रा. मारवड) याचे असल्याचे सांगितले.
मालकाने घोड्यांची कोंबून वाहतूक केली आणि वैद्यकीय तपासणी देखील केलेली नव्हती. म्हणून पोलिसांनी १ लाख ५५ हजार ५०० रुपयांचे १२ घोडे व शिंगरू तसेच २ लाख ५० हजार रुपयांचा ट्रक असा ४ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रक चालक आणि घोड्यांचा मालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.