चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची कामगिरी
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी पहाटे एका तरुणाला गावठी बनावटीच्या पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह रंगेहात पकडण्यात यश मिळवले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस शिपाई रविंद्र निंबा बच्छे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक मनेळ, उपनिरीक्षक गणेश सायकर तसेच पोलीस कर्मचारी निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटोळ, नरेंद्र चौधरी, कल्पेश पगारे, केतन सुर्यवंशी, राकेश महाजन आणि पंचांच्या उपस्थितीत कोबींग ऑपरेशनसाठी रवाना झाले होते. दरम्यान, दि. १२ ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच वाजता गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक तरुण छाजेड ऑईल मिलच्या पाठीमागे, घाटरोड ते हुडको त्रिमूर्ती बेकरी मार्गावर गावठी कट्टा घेऊन येणार आहे.
त्यानुसार पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. थोड्याच वेळात संशयास्पद हालचाल करणारा एक तरुण दिसला. पोलिसांनी त्याला वेढा घालून पंचांसमक्ष चौकशी केली. त्याने नाव मयुर राजु मोरे (वय १९, रा. प्रभात गल्ली, चाळीसगाव) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूस लपवलेले गावठी बनावटीचे ३० हजार रुपयांचे पिस्तुल आणि खिशात दोन जीवंत काडतूस असे एकूण ३२ हजार किंमतीचे अग्निशस्त्र मिळाले. त्याच्याकडे शस्त्राचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचेही पंचांसमक्ष उघड झाले.
पोलिसांनी मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेतला असून मयुर मोरे याला पुढील चौकशीसाठी पोलिस स्टेशनला आणण्यात आले आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश सायकर व गुन्हे शोध पथकाने केली.