पाचोरा तालुक्यातील खळबळजनक घटना
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील एका तरुणाचा मध्यरात्री संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान हा अपघात आहे की घातपात याबाबत स्पष्टता नाही. मध्यरात्री तरुणाला अज्ञात २ इसमांनी बोलावून घेत बेदम मारहाण करून त्याचा खून केला अशी माहिती मयत तरुणाच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
हर्षल ओंकार साळुंखे (वय २६, रा. शाहूनगर, भडगाव रोड , पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो पाचोरा येथे आई, भाऊ, बहीण यांच्यासह राहत होता. त्याच्याकडे ट्रॅक्टर असून ट्रॅक्टर भाड्याने देऊन त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर तो उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी दि.१५ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह पुनगाव रोड येथे आढळून आला. सुरुवातीला हा अपघात असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
मात्र नातेवाईकांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, हर्षल साळुंखे याला मध्यरात्री अज्ञात दोन्ही इसमांनी अंतुरली रस्त्यावर ट्रॅक्टर फसले आहे. लवकर ये असे सांगून बोलावून घेतले. त्यानंतर काही वेळानंतर हर्षल जखमी अवस्थेत पुनगाव रोड जवळ असल्याची माहिती काही ग्रामस्थांकडून नातेवाईकांना देण्यात आली. नातेवाईकांनी धाव घेत त्याला तात्काळ जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
हर्षल साळुंखे याचा पाय, उजवा हात फॅक्चर असून बरगड्यांना जबर मार लागलेला आहे. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असावा असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास आणण्यात आला असून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही केली आहे.