जळगाव जिल्ह्यात पोलिसांपुढे चोरटयांनी उभे केले आव्हान
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरात घरफोड्या व दुकान फोडून चोऱ्या करण्याचे प्रकार सुरूच आहे. शहरातील जुना खेडी रोड परिसरात राहणाऱ्या तरूणाचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकडसह एकुण १ लाख २० हजार ४६३ रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवार दि. ३ जून रोजी दुपारी १ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी ४ जून रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश लक्ष्मण पाटील (वय ३६ रा. जुना खेडी रोड, जळगाव) हा तरूण महावितरण कंपनीत नोकरीला आहे. दि. ३ जून रोजी त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने बंद घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख २० हजार ४६३ रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार दुपारी १ वाजता उघडकीला आला. उमेश पाटील यांनी घरात चोरी झाल्या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी ४ जून रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर ह्या करीत आहे.