जळगावतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- घरगुती वादातून रागाच्या भरात विषारीद्रव्य प्राशन केलेला २० वर्षीय तरूणाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
जतीन श्याम लेहलकर (वय २०, रा. चौघुले प्लॉट, शनीपेठ, जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. शहरातील चौघुले प्लॉट परिससरात जतीन लेहलकर हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्यांचे नवीन बसस्थानक परिसरात महात्मा गांधी उद्यानजवळ दुकान आहे. सोमवारी १ जानेवारी रोजी सकाळी त्यांचे घरात किरकोळ वाद होवून भांडण झाले होते. या रागातून जतीनने संतापाच्या भरात विषारी औषध सेवन केले. त्यानंतर तो ममुराबाद रोड परिसरात असलेल्या मंदिराजवळ गेला. याठिकाणी त्याला अस्वस्थ वाटू लागले.
त्याने वडिलांना फोन करुन आपण विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती दिली. त्याच्या वडीलांनी तात्काळ त्या ठिकाणी जावून मुलगा जतीनला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांपासून त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना बुधवारी २ जानेवारी राजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला होता. त्याने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे आई वडीलांसह भावाला मानसिक धक्का बसला आहे.याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.