जळगाव (प्रतिनिधी) : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत घरात घुसून फ्रिजवर ठेवलेली २५ हजार रुपये किमतीची सोनपोत चोरट्याने लांबविली. ही घटना दि. १४ ऑगस्ट रोजी गेंदालाल मिल परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय बाविस्कर (३४) हे गेंदालाल परिसरात राहतात. ते रिक्षा चालक आहेत. बुधवारी दिनांक १४ ऑगस्ट रोजी त्यांच्या पत्नीने सोनपोत काढून फ्रिजवर ठेवली होती. त्यावेळी दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत प्रकाश नेकराम खरते उर्फ बारेला (२२, रा. कोचुर सावदा) याने घरात घुसून सोनपोत लांबविली. या प्रकरणी विजय बाविस्कर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून १६ ऑगस्ट रोजी प्रकाश खरतेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार सुनील पाटील करीत आहेत.