सात्रीत शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; १३.७८ लाखांचा ऐवज लंपास


घरफोडीत लाखोंचे सोन्याचे दागिने, रोकड आणि कागदपत्रे चोरीला
अमळनेर : प्रतिनिधी — अमळनेर तालुक्यातील सात्री गावात शिक्षकाच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १३ लाख ७८ हजार ७५८ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घरफोडीत लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, रोकड तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना आणि बँकेचे एटीएम कार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत.
घरफोडी करून कपाटातील ऐवज लंपास
फिर्यादी राकेश सुभाष बोऱसे (वय ३३, व्यवसाय शिक्षक, रा. सात्री, ता. अमळनेर) यांच्या घरात ही चोरी झाली. २६ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरफोडी केली. घरातील कपाट उघडून त्यातील सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेण्यात आल्या.
फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने घरातील मौल्यवान ऐवज लंपास केला असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे
चोरट्यांनी लंपास केलेल्या ऐवजात विविध सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
२२ कॅरेट सोन्याची चैन — १५.७८० ग्रॅम, किंमत २ लाख ५७ हजार ३५६ रुपये
२२ कॅरेट सोन्याचा लांब हार — ३८.६७० ग्रॅम, किंमत ६ लाख ४४ हजार ८९९ रुपये
२२ कॅरेट सोन्याची पेंडल — ११.५८० ग्रॅम, किंमत १ लाख ९३ हजार १२० रुपये
२४ कॅरेट सोन्याची अंगठी — ५.०३० ग्रॅम, किंमत ७९ हजार ५९९ रुपये
२२ कॅरेट सोन्याचे नेकलेस — ११.८०० ग्रॅम, किंमत १ लाख ५२ हजार ३९७ रुपये
२२ कॅरेट सोन्याची कानातील बाळी — १.५८० ग्रॅम, किंमत २१ हजार ३६८ रुपये
२२ कॅरेट सोन्याची खडा असलेली अंगठी — २.०२० ग्रॅम, किंमत २७ हजार ३१९ रुपये
याशिवाय लेदरच्या पाकिटातील २ हजार ७०० रुपये रोकड, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना आणि बँकेचे एटीएम कार्ड आदी कागदपत्रेही चोरीला गेली आहेतसोन्याचे दागिने, रोकड आणि इतर साहित्य मिळून एकूण १३ लाख ७८ हजार ७५८ रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३०५ नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप अज्ञात असून त्याला अटक झालेली नाही.
अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मजीद मन्सुरी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.
सात्री गावातील या धाडसी घरफोडीमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत असून, अज्ञात चोरट्याचा तातडीने शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.









