यावल शहरातील घटना, नातलगांचा रुग्णालयात संताप
यावल (प्रतिनिधी) : शहरातील बोरावल गेट भागातील रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय महिलेला रविवारी सकाळी राहत्या घरात सर्पदंश झाला. महिलेला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात येत असताना रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला. यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिलेच्या नातलगांनी मृतदेह परत यावल रुग्णालयात आणत उपचारात दिरंगाई केल्याचा आरोप त्यांनी रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला. रुग्णालयात नागरिकांची गर्दी झाल्याने पोलिसांनी या ठिकाणी येऊन रुग्णांच्या नातेवाईकांची समजूत काढली.
निर्मला शंकर पवार (वय ४५) असे मयत महिलेचे नाव आहे. शहरातील बोरवल गेट भागात गाडगे नगरात त्या राहत होत्या. परिवारासह त्या राहत होत्या. रविवारी दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी घरात घरकाम करत असताना तिच्या उजव्या पायाला अचानक सापाने दंश केला.(केसीएन) हा प्रकार निदर्शनास येताच कुटुंबीयांनी महिलेला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.कोमल नरवाडे-पाटील यांनी प्रथमोपचार सुरू केले. उपचार सुरू असतांना अचानक महिलेची प्रकृती बिघल्याने डॉक्टरांनी त्यांना येथून जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दिला.
जळगाव येथे नेत असतानांच रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी मृतदेह तेथून थेट यावल ग्रामीण रुग्णालयात आणत उपचारादरम्यान दिरंगाई केल्याचा आरोप करीत संताप व्यक्त केला.(केसीएन) रुग्णालयात यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक फौजदार असलम खान, हवालदार वासुदेव मराठे, संदीप सूर्यवंशी, वसीम खान, विनोद बाविस्कर, हर्षद गवळी हे पथकासह रुग्णालयात दाखल झाले. मयताच्या नातलगांची समजूत काढल्यानंतर जमाव शांत झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहे.