जळगावातील श्रीराम नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील दादावाडी येथील श्रीराम नगरातून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांचे बंद घराचे कडी कोयंडा तोडून चोरटयांनी घरातून गॅस सिलेंडर चोरून नेल्याची घटना शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २ सप्टेंबर रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील दादावाडी परिसरातील श्रीराम नगरात तुकाराम नामदेव गांधिले (वय-६३) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहे. दरम्यान दि. ३० ते ३१ ऑगस्ट दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यात गॅस सिलेंडर चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या संदर्भात सोमवारी दि. २ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी हे करीत आहे.