साकेगावच्या माजी विद्यार्थ्यांकडून “एक हात मदती”चा
भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील गत जानेवारी महिन्यात झालेल्या गेट-टुगेदर कार्यक्रमातील जमा झालेली आर्थिक रक्कम स्वर्गीय मित्राच्या परिवारास ‘एक हात मदती’चा या अंतर्गत साकेगावच्या माजी विद्यार्थ्यांनी १ जून रोजी झोडगे ता. मालेगाव जि. नाशिक येथे जाऊन दिली.
स्व. सुधाकर फुलशिंग सोनवणे हा विद्यार्थी साकेगाव येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयात शिक्षणास होता. वडिलांच्या बदलीमुळे त्याला साकेगाव सोडावं लागलं होतं. दरम्यान तो त्याच्या गावी झोडगे येथे वास्तव्यास गेला. कालांतराने म्हणजेच २८ वर्षानंतर त्याने इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात गेट-टुगेदर व्हावे, यासाठीची १५ जानेवारी २०२५ ही तारीखही निश्चित केली होती. मात्र काळाला काही वेगळंच मान्य होतं. सुधाकर सोनवणे याचा १७ नोव्हेंबर २०२४ ला आकस्मित मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी साकेगावातील १९९८- ९९ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी त्याच तारखेला गेट-टुगेदर घेऊन स्वर्गीय सुधाकर सोनवणे याच्या परिवारास आर्थिक मदत जमा केली होती.
त्यात नंतर अनेक माजी विद्यार्थ्यांनी यात भर घालून एक हात मदतीचा यांतर्गत ४१ हजार रुपये जमा केलेत. या मदतीत शिक्षकांनी सुद्धा हातभार लावलेला आहे. स्व. सुधाकरच्या मागे आई, पत्नी वैशाली, मोठी मुलगी ईश्वरी (इयत्ता ८ वी), दुसरी मुलगी धैर्या (इयत्ता ४ थी), लहान मुलगा हसराज (इयत्ता २ री) व विवाहीत भाऊ असा मोठा परिवार आहे. सुधाकरचे वडील याआधीच वारले आहेत. परिवाराची जबाबदारी ही सुधाकरवरच होती. तो अचानक जाण्याने फार मोठी हानी झाली आहे. ती कधीच भरून न निघणारी आहे.
रक्कम मुलाच्या नावाने एफडी
रोख रक्कम देण्याऐवजी आम्ही परिणामी साकेगावच्या विद्यार्थी ग्रुपने सुधाकरचा सर्वात लहान मुलगा हसराज याच्या नावाने ४१ हजार रुपयांची एफडी करण्याचा निर्णय घेतला. कारण भविष्यासाठी त्याच्या शिक्षणासाठी ही रक्कम उपयोगी पडेल, असा आमचा उद्देश आहे.
सर्वांचे प्रयत्न महत्वाचे
इंदिरा गांधी विद्यालयाच्या दहावीतील सर्वच माजी विद्यार्थ्यांनी यासाठी मोलाची साथ दिली व प्रयत्न केलेत. “एक हात मदती”चा या अंतर्गत भविष्यात सुद्धा कार्य केले जाईल, असा निश्चय करण्यात आला आहे. ६० सदस्यांचा हा ग्रुप आहे. या ग्रुपने थोडं का ईना स्व. सुधाकरच्या परिवाराच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढेही मदतीचे आश्वासन ग्रुपने दिले आहे.