जळगाव (प्रतिनिधी) – गावठी पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसांसह दोघांना गुन्हे शाखेने आव्हाने येथून अटक केली आहे .
सागर देविदास सोनवणे व भास्कर अशोक नन्नवरे (दोघे रा. बांभोरी ता. धरणगाव) अशी आरोपींची नावे आहेत. बांभोरी येथील दोन तरुणांकडे विना परवाना गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अनिल जाधव, अशरफ शेख , दीपक शिंदे, विजय चौधरी यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने संशयितांची माहिती काढली दोघेही संशयित जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने आव्हाणे येथे सापळा रचुन दोघांना अटक केली. चौकशीत संशयित सागर सोनवणे यांच्याकडे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस तर भास्कर नन्नवरे यांच्याकडे 6 जिवंत काडतुसे मिळून आले . दोघांकडून गावठी कट्यासह काडतुस तसेच दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.