वरणगाव पोलीस कर्मचाऱ्यांची कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) : मुक्ताईनगरातील दोघांना गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस बाळगला म्हणून वरणगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली. ही कारवाई वरणगाव शहरातील हॉटेल चायलाजवळ रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
वरणगाव शहरातील हॉटेल चायला जवळ संशयीत शस्त्रासह येणार असल्याची माहिती वरणगावचे सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. वरणगाव पोलिसांनी रविवारदि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी सिध्दार्थ संतोष भालेराव (वय २३, डॉ. आंबेडकरनगर, मुक्ताईनगर) व अनिरूध्द कैलास ठाकूर (वय २०, सुराणा नगर, मुक्ताईनगर) यांना ताब्यात घेतले. संशयीतांच्या अंग झडतीत त्यांच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, ४ हजार रुपये किंमतीचे २ जिवंत काडतूस तसेच ५ हजार रुपये किंमतीचे मॅग्झीन जप्त करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल मनोज म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे करीत आहे.