चोपडा तालुक्यात वैजापूर वनपरिक्षेत्र भागात घटना, २ दुचाकी जप्त
यावल (प्रतिनिधी) :- यावल वन विभागाच्या वैजापूर वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक २२६, २२५, २२३ आणि २३२ या भागात वन पथक गस्त घालत होते. कक्ष क्रमांक २३२ मधील जंगल भागात अचानक गावठी बंदुकीने फायर झाल्याचा आवाज ऐकू आला. वन पथकाने तातडीने आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता, काही अज्ञात इसम गावठी बंदुके घेऊन दिसून आले. वन पथकाची चाहूल लागताच, या अज्ञात इसमांनी आपल्या जवळच्या कक्ष क्रमांक २३२ मधील जंगल भागात लपवलेल्या दोन मोटरसायकली जागेवरच सोडून दऱ्या-खोऱ्यांचा फायदा घेत पळ काढला. हे अज्ञात इसम परप्रांतीय असून, राखीव वनात अनधिकृतपणे प्रवेश करून शिकारीच्या उद्देशाने आले असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
पथकाने संपूर्ण जंगल भागात तपासणी केली असता, कोणत्याही प्रकारे वन्यजीवाला हानी पोहोचलेली नसल्याचे आढळले. जप्त केलेल्या दोन्ही मोटरसायकली शासकीय वाहनाने चोपडा शासकीय आगारात जमा करण्यात आल्या आहेत. वैजापूर येथील वनपाल यांनी याबाबत प्रथम गुन्हा जारी केला आहे. सदरची ही कामगिरी वनपाल आय.एस. तडवी (वैजापूर), संदीप भोई, चुनिलाल कोळी, बाजीराव बारेला, भारसिंग बारेला, संदीप ठाकरे, निखिल माळी, हर्षल पावरा, गणेश बारेला, आणि विजय शिरसाठ यांनी यशस्वीपणे पार पाडली. ही कार्यवाही धुळे प्रादेशिकच्या वनसंरक्षक नीनु सोमराज, यावल वनविभाग प्रादेशिक जळगावचे उपवनसंरक्षक जमीर शेख, चोपडा येथील सहाय्यक वन संरक्षक प्रथमेश हाडपे, सहाय्यक वन संरक्षक समाधान पाटील, आणि वैजापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.