चोपडा तालुक्यातील घुमावल येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील घुमावल बुद्रुक गावात वृद्धाने विरोधी पक्षाचे गावात मतदान फोडले व आमच्या उमेदवारास पाडण्यास कारणीभूत ठरले म्हणून धनराज जगन्नाथ पाटील (वय ६५) यांना चार ते पाच जणांनी जबर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या कारणावरून चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घुमावल बुद्रुक या गावात दि. २३ रोजी विधानसभा निवडणुकीच्या दिवशी धनराज जगन्नाथ पाटील यांनी माझ्या पक्षाचे गावात मतदान फोडले व आमच्या उमेदवारास पाडले व ग्रामपंचायतीचे सुध्दा आमचे विरुध्द बिनविरोध सरपंच निवडून दिले व विकास सोसायटीमध्ये सुध्दा बिनविरोध संचालकांना आमचे विरुध्द निवडून दिले. त्या दिवसापासून आमच्या लक्षात आहे. म्हणून आज तुला सर्वजण मिळून जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत वसंत प्रेमराज पाटील, धनराज वसंत पाटील, विशाल वसंत पाटील, देवानंद प्रेमराज पाटील, भूषण विश्वास पाटील, यांनी धनराज जगन्नाथ पाटील यांना मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. या कारणावरून चोपडा ग्रामीण पोलिसात धनराज पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोहेका नासीर तडवी करीत आहे.