पंतप्रधान मोदींचे कार्य, योजना ग्रामस्थांना सांगणार
मंत्री गिरीश महाजन यांची पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात दि. ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान “गाव चलो अभियान” राबविले जाणार आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यात ३ हजार ८०० गावांत भाजपचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी हे गावात तळ ठोकून पंतप्रधान मोदींचे दहा वर्षातील कार्य ग्रामस्थांना सांगणार असून विविध योजनांचा आढावा घेणार आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत पर्यटन, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दिली.
पत्रकार परिषदेला आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, डॉ. उल्हास पाटील, माजी आ. स्मिता वाघ, नंदकिशोर महाजन, डॉ. राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते. मंत्री महाजन पुढे म्हणाले की, प्रत्येक मतदारांपर्यंत “गाव चलो अभियान” राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत पंतप्रधान मोदी यांनी १० वर्षात केलेले कार्य, विविध योजना जनतेपर्यंत सांगितल्या जाणार आहेत. यासाठी तळागाळातील पदाधिकारी, कार्यकर्ते काम करणार असल्याचे महाजन म्हणाले.
भविष्यात अनेक दिग्गज नेते हे भाजपात प्रवेश करणार असून याबाबत सातत्याने राज्यभर चर्चा सुरु आहे. तसेच, जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असून तो अभेद्य राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यटनासाठी ५ कोटी देणार
जिल्ह्यात पर्यटनाच्या भरपूर संधी असून पर्यटनमंत्री म्हणून भरघोस निधी उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ब वर्ग असणाऱ्या तीर्थक्षेत्रांना आता २ कोटींपासून ५ कोटींवर निधी दिला जाणार आहे.
आ. गायकवाड यांची गोळीबाराची घटना धक्कादायक
कल्याण येथील आ. गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची घटना धक्कादायक आहे. ते माझे सहकारी आहे. त्यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले ? हे कळतच नाही. हा प्रकार राजकीय वादातून झालेला नसून तो वैयक्तिक वादातून झाला आहे. गायकवाड यांच्याबाबत कारवाई करायचे असेल तर ती पक्षनेतृत्व करतील, अशी माहितीहि मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.