भुसावळ शहरात मार्डन रोडवर बाजारपेठ पोलिसांना यश
भुसावळ (प्रतिनिधी) :- शहरातील मार्डन रोडवरील अमर स्टोअर्सजवळ ३ संशयित इसम पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास लोटगाडीवरून रेल्वेचे स्लिपर चोरून वाहतूक करीत होते. मात्र, बाजारपेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलिसांचे रात्रीची गस्त करणारे पोलीस कर्मचारी कांतीलाल केदारे व हर्षल महाजन हे नेहमी प्रमाणे गस्तीवर होते. शहरातील मार्डन रोडवरील अमर स्टोअर्सजवळ ३ संशयित इसम पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास लोटगाडीवरून रेल्वेचे स्लिपर चोरून वाहतूक करीत होते. ही बाब लक्षात येताच गस्ती पथकाने वाहन थांबवून चोरट्यांच्या दिशेने धाव घेतली असता चोरट्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र तिघही संशयित लोटगाडी सोडून जुने सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कार्यालयाच्या दिशेने अंधार्याचा फायदा घेत पसार झाले.
त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाईकामी लोटगाडीसह पाच रेल्वेचे स्लिपर असा सर्व मुद्देमाल जप्त करून बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा केला. तसेच या प्रकाराबाबत रेल्वे सुरक्षा बल विभागाचे कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी दुपारी बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठले व पुढील कारवाई कामी मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.