धुळे ( प्रतिनिधी ) – लग्नघरात रात्री स्वयंपाक सुरू असताना गॅसचा भडका उडाला. घरातील संपूर्ण साहित्य खाक झाले. नागरिकांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आली जीवितहानी झाली नाही; परंतु लग्नाच्या साहित्यासह संसारोपयोगी साहित्य खाक झाले.
पाटण येथील कोमलसिंग गुलझारसिंग गिरासे या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर संकट आले. गिरासे यांच्या लहान मुलीचे 6 फेब्रुवारीला लग्न नियोजित होते. घरात लग्नाची लगबग सुरू होती. घरात नातेवाईकांची गर्दी होती. गुरूवारी रात्री नेहमीप्रमाणे वरच्या मजल्यावर स्वयंपाक सुरू होता अचानक गॅसने भडका घेतल्याने संपुर्ण घरात आग लागली. दागिन्यांसह सर्वच सामानाने पेट घेतला. ग्रामस्थांनी आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले. आग वाढतच गेल्याने शिंदखेडा नगरपंचायतीचा अग्नीशमन बंब हजर झाल्याने झाल्याने आग आटोक्यात आली. पंचनाम्यानंतर शासकीय स्तरावरून नुकसान भरपाईसह आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
आग लागल्यावर ग्रामस्थांनी सर्वात अगोदर या कुटुंबाला घराबाहेर बाहेर सुरक्षित काढल्याने पुढील अनर्थ टळला. मोठ्या कष्टाने जमा केलेल्या पैशातून खरेदी केलेले लग्नासाठीचे साहित्य तसेच तिला द्यावयाचे रुखवतीचे साहित्य आगीत जाळल्याने कोमलसिंग गिरासे यांच्या वधू मुलीसह कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आगीमध्ये या शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. परंतु, मोठ्या थाटात विवाह करून मुलीसाठी संसारपयोगी वस्तु जळाल्याने आता मुलीला द्यायचे काय? हा प्रश्न गिरासे कुटुंबियांसमोर आहे.