जळगाव ( प्रतिनिधी ) – एमआयडीसीतील व्ही – सेक्टरमधील गॅरेज येथून रिपेअरींगसाठी आलेल्या तीन लक्झरी बसेसमधून ३ ईन्व्हर्टर, ३ ॲम्प्लीफायर आणि सहा बॅटरी असा एकुण ४८ हजार रूपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनराज बलदेव परदेशी (वय-४०) रा. रायपुर, ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. त्यांचे एमआयडीसीतील व्ही-सेक्टरमध्ये गॅरेज आहे. १५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास धनराज परदेशी यांच्या गॅरेजवर तीन लक्झरी बसेस रिपेरिंग करण्यासाठी आलेल्या होत्या.
मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ३ ईन्व्हर्टर, ३ ॲम्प्लीफायर आणि सहा बॅटरी असा एकुण ४८ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. गॅरेज मालक धनराज परदेशी यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.
त्यानुसार दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.