अमळनेर पोलीस स्टेशनची कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरात गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या सारबेटे येथील दोघांना पोलिसांनी हेडावे येथे सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून साडेतीन किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक विकास देवरे याना गोपनीय माहिती मिळाली होती. तालुक्यातील सारबेटे येथून (एमएच १९, डीयू ९५४३) या मोटरसायकलवर दोन जण अमळनेर शहरात गांजा विकण्यासाठी आणत आहेत. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सुनील महाजन, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील, विनोद संदानशीव, संतोष नागरे, सागर साळुंखे याना घेऊन हेडावे गावाजवळ सापळा रचला. सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास दोन जण दुचाकीवरून येतांना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्या दोघांच्या मध्ये पांढऱ्या रंगाची प्लास्टिक गोणी आढळून आली.
तपासणीत गांजा सापडला. पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता अकील इब्राहिम मेवाती (वय-३७) व मोहसीनखान शरीफखान मेवाती (वय-३२, दोन्ही रा. सारबेटे) असे सांगितले. पोलिसांनी गांजाचे मोजमाप केले असता ६८ हजार रुपये किमतीचा ३ किलो ४३२ ग्राम गांजा , ६० हजार रुपये किमतीची गुन्हयात वापरलेली मोटरसायकल व १० हजार रुपये किमतीचे मोबाईल असा एकूण १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिलिंद सोनार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.