भुसावळ ( प्रतिनिधी ) – बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून ३३ किलो गांजा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. रावेर येथील ब्राऊन शुगर नंतर गांजाची ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.
रावेर येथे काही दिवसांपूर्वी एलसीबी पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत तब्बल एक कोटी रूपयांचे ब्राऊन शुगर जप्त करून एका महिलेस अटक करण्यात आली होती. नंतर मुख सूत्रधार मध्यप्रदेशातील मंदसौर येथील इसमाला अटक करण्यात आली असून ते सध्या कोठडीत आहेत.
काल रात्री बाजारपेठचे निरिक्षक दिलीप भागवत यांना एका वाहनातून भुसावळच्या बसस्थानक परिसरात गांजा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. या पथकाने बसस्थानकाच्या परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास वाहन अडविले असता त्यात ३३ किलो वजनाइतका गांजा आढळून आला. या संदर्भात बाजारपेठ पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.