श्री गणेशाचे १९ सप्टेंबरला आगमन
जळगाव (प्रतिनिधी) – यंदा अधिक मासामुळे गणपती बाप्पाचे आगमन उशिराने होणार आहे. अडीच महिन्यांनी घरोघरी गणराय विराजमान होणार असले, तरी गणेशमूर्ती घडविण्यासाठी कारागिरांची लगबग झाली आहे. या वर्षी कच्चा माल २० ते २५ टक्के महागल्यामुळे गणेशमूर्तीचे दरही वाढणार आहेत. प्रामुख्याने वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे.
गणेशोत्सव अडीच महिन्यांवर आला आहे. घरोघरी व सार्वजनिक मंडपात गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. जळगावात लहान, मोठ्या आकारातील मूर्तींना मागणी असते. कारखान्यात गणेशमूर्तींचे काम सुरू झाले आहे. अधिक मासामुळे गणपती बाप्पाचे आगमन १९ दिवस उशिराने होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यंदा अधिक मासाला तब्बल १९ वर्षांनी असा योग जुळून आला असून, हिंदू पंचांगानुसार या वेळी अधिक मास १८ जुलैपासून सुरू होत आहे आणि तो १६ ऑगस्टला समाप्त होईल. यापूर्वी असा योगायोग २००४ मध्ये जुळून आला होता आणि त्या वेळीही १८ जुलैपासून अधिक मास सुरू होऊन १६ ऑगस्टला संपला होता.
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार : जिल्हाधिकारी ; ‘श्रीं’चे १९ सप्टेंबरला आगमन
मागील वर्षी ३१ ऑगस्टला गणपती बाप्पाचे आगमन झाले होते, तर ९ सप्टेंबरला अनंत चतुर्थीला निरोप देण्यात आला होता. या वर्षी मात्र १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरवात होईल, तर २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. १० दिवस श्री गणेशाचा मुक्काम असणार आहे. गणेशोत्सव लांबणीवर असला, तरी मूर्तिकार सध्या कामाला लागले आहेत.
“सध्या गणेशमूर्ती बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. मूर्तीची सफाई, प्रायमर देणे, मोठ्या मूर्तीसाठी लोखंडी ट्रॉलीची डागडुजी आदी कामे सुरू आहेत.”-रामकृष्ण कुंभार, मूर्तिकार