एरंडोल शहरात नागोबा मढी परिसरात घटना, ३ संशयितांना अटक
एरंडोल (प्रतिनिधी) – येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादात चॉपरने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. युवकावर चॉपरने हल्ला केल्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, नागोबा मढी परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

निहीर लक्ष्मण मराठे व त्याचा मित्र प्रसाद सुनील पाटील हे दुचाकी(क्रमांक एमएच-१९ डीएन-०८४२) ने बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास कैटवाडी येथे मित्र ऋषी पाटील यास भेटण्यासाठी गेले होते. ऋषी पाटील घरी नसल्यामुळे ते परत येत असताना बापू बन्सी महाजन यांचे घरासमोर यशवंत पाटील, गजानन पाटील यांनी दुचाकी अडवून तुम्ही या गल्लीत का आले, असे विचारून शिवीगाळ केली. प्रसाद पाटील याने शिवीगाळ का करीत आहात असे विचारले असता यशवंत पाटील याने पुन्हा शिवीगाळ करून तुम्हाला आज जिवंत ठेवणार नाही असे बोलून कमरेला लावलेला चॉपर काढून प्रसाद याचेवर हल्ला केला.
निहीर मराठे याने प्रसादला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हातास दुखापत झाली. त्यानंतर यशवंत पाटील याने पुन्हा प्रसाद पाटील याच्या पोटावर चॉपरने वार केल्यामुळे तो गंभीर जखमी होऊन मोटार सायकलवरून खाली पडला. त्यानंतर गजानन पाटील याने पुन्हा प्रसाद याच्या पायावर तलवारीने वार करून जखमी केले. त्याचवेळी यशवंतचे वडील शंकर पाटील लाकडी दांडका घेऊन आले व प्रसादाच्या डोक्यावर व पायावर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या प्रसाद यास ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास जळगाव येथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. याबाबत निहीर मराठे याने दिलेल्या तक्रारीवरून शंकर पाटील, गजानन पाटील, यशवंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघाही संशयितांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड पुढील तपास करीत आहेत.









