चोरीचे दागिने घेणाऱ्या व्यक्तीलाही अटक
जळगाव (प्रतिनिधी) : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीने शहरात घरफोडी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यासह सोन्या-चांदीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफ बाजारातील व्यापाराला देखील अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना घरफोडीचे गुन्हे थांबविण्यासाठी संशयित आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस अमलदार पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, कमलाकर बागुल, संदीप पाटील, चालक मोतीलाल चौधरी यांचे पथक तयार केले होते. या पथकाने गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढली. त्यानुसार संशयित इसम विशाल मुरलीधर दाभाडे, शुभम उर्फ मोनू प्रभाकर चव्हाण (दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली.
त्यावेळी त्यांनी त्यांचा साथीदार विशाल संतोष भोई (रा. तांबापुरा, जळगाव) यांना अटक केली आहे. शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील दशरथ नगर आणि सुदर्शन पार्क तसेच जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीत चंद्रप्रभा कॉलनी अशा ठिकाणी घरफोडी केल्याचे कबूल केले आहे. तसेच चोरी केलेले सोन्याचांदीचे दागिने हे सराफ बाजारातील संशयित आरोपी नेताजी पंढरीनाथ जगताप यांना दिल्याचे सांगितले. त्यानुसार नेताजी जगताप यांना देखील ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.