भुसावळ शहरातील घटना
भुसावळ प्रतिनिधी ऑनलाईन हयातीचा दाखला काढण्याच्या बहाण्याने भुसावळ येथे सेवानिवृत बँक अधिकारी यांनाच साडेतीन लाख रुपयात फसविल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे फसवणूक करणाऱ्याने अवघ्या १५ मिनिटात त्यांच्या खात्यातील रक्कम लंपास केली.
भुसावळ शहरातील यावल रोड परिसरातील रहिवासी बँक ऑफ बडोदामधून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. फेसबुकवर ‘हयातीचा दाखला ऑनलाइन करा, घरबसल्या सोयीस्कर सेवा’ अशी जाहिरात पाहून त्यांनी संबंधित लिंक उघडली असता हा प्रकार घडला. पैसे वर्ग होताच फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधितांनी बँक ऑफ बडोदा शाखेत धाव घेतली. मुंबई मुख्यालयातही कळवले. पण, तोपर्यंत संपूर्ण रक्कम अज्ञात भामट्यांनी काढलेली होती. या प्रकरणी जळगाव येथील सायबर सेलमध्ये माहिती देण्यात आली.
भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे करत आहेत. ही फसवणूक झारखंडमधून झाल्याची प्राथमिक माहिती सायबरकडून मिळत आहे. झारखंड येथून स्वतःला पडताळणी करणारा अधिकारी सांगणाऱ्या भुपेंद्रदास गुप्ता नावाच्या व्यक्तीचा फोन आला. तुम्ही पाठवलेल्या माहितीची पडताळणी करायची आहे असे सांगत त्याने व्हॉट्स अॅपवर कॉल केला. त्यादरम्यान मेल आयडी आणि पासवर्ड विचारून फोन सुरू ठेवा अशी सूचना केली. काही मिनिटातच त्यांच्या खात्यातील ३ लाख ५० हजार रूपये ऑनलाइन वळविले आहे.









