मुंबई ( प्रतिनिधी ) – वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला व मुळचा जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी असलेला बोगस डॉक्टर हेमंत पाटीलबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. मसाला विक्रीचा एजन्ट म्हणून काम करणारा तो थेट अस्थिरोगतज्ज्ञ बनल्याचे उघड झाले आहे.
हेमंत पाटील ऊर्फ सोनावणे याने दहावीनंतर अवघ्या तीन वर्षांत एमबीबीएसची पदवी मिळवली होती. डॉक्टर झाल्यानंतरही तो एका एजन्सीत मसाला विक्रीचे, तसेच एका कंपनीत सेल्समनचे काम करत असल्याचे कागदपत्रांवरून उघड झाले आहे.
सुनील वाडकर या तोतया डॉक्टरचा बनाव समोर आल्यानंतर हेमंत पाटील बोगस डॉक्टर असल्याचे उघडकीस आले सामाजिक कार्यकर्त्यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच हेमंत पाटील फरार झाला त्याने वसई पारनाका येथील क्लिनिक बंद केले.
हेमंत पाटील १९८७ साली जळगाव येथून दहावी उत्तीर्ण झाला नंतर तो १९९१ पर्यंत जळगाव येथे मसाला विक्री करत होता. १९९१ ते १९९६ मध्ये तो युरेका फोर्ब्समध्ये सेल्समन होता, १९९६ ते २००४ पर्यंत गुजरातच्या ऑर्थोकेअरमध्ये सेल्समनचे काम केले. नंतर अचानक तो डॉक्टर बनून समोर आला. १९९० मध्ये त्याने बडोदा मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि याच महाविद्यालयातून १९९६ मध्ये अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून एम.एस. (मास्टर्स ऑफ सर्जरी) मिळविल्याचे प्रमाणपत्र दाखवू लागला. १९८७ साली दहावी झालेला विद्यार्थी पुढील तीन वर्षांत म्हणजे १९९० मध्ये डॉक्टर कसा बनला? तो १९९० मध्ये डॉक्टर होता तर सेल्समन म्हणून का काम करत होता? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुजरातमधील विद्यापीठातून एमबीबीएस आणि एम.एस. पदवी मिळाली मात्र अशा प्रकारची कुठलीही कागदपत्रे तो पालिका अथवा पोलिसांना सादर करू शकला नाही.
हेमंत पाटील याची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तसेच वसई-विरार महापालिकेकडे डॉक्टर म्हणून कुठलीही नोंद नाही. त्याने सादर केलेला ३२८७१ हा नोंदणी क्रमांक डॉ. दिलसुख पंजवानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. २००७ सालापासून त्याचे नूतनीकरण झालेले नाही. डॉ. पंजवानी सध्या कॅनडामध्ये स्थायिक आहेत.
हेमंत पाटील वसईतील पारनाका परिसरात २०१८ सालापासून क्लिनिक चालवत होता. अनेक नामांकित रुग्णालयांत तो अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून शस्त्रक्रिया करत होता. आता त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी अनेक रुग्ण वसई पोलीस ठाण्यात आले. आतापर्यंत आठ जणांनी तक्रारी दिल्या अनेकांना हेमंत पाटील याने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे व्यंगत्व आलेले आहे. किंवा शस्त्रक्रिया फसली आहे, असे वसई पोलिसांनी सांगितले.