जळगाव : – अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या फाईलवर क्लिक करताच मोबाईल हॅक होवून शिक्षकेच्या खात्यातून पावणेदोन लाख रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाले. ही घटना दि. ३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. शिक्षीकेने रक्कम गोठवली मात्र बरेच दिवस झाले ती परत न मिळाल्याने अखेर त्यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिल्यानुसार फसवणुक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील योगेश्वर नगरात स्वप्ना खुशबू पाटील (वय ३८) या वास्तव्यास असून त्या एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षीका आहे. दि. ३ सप्टेंबर रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला, समासेरील व्यक्तीने तुमचे क्रेडीट कार्ड बंद न केल्यास तुम्हाला अडीच हजार रुपये भरावे लागतील असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे शिक्षिकेने कॉल कट केला. त्यानंतर याशिक्षिकेच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून एक फाईल आली. तिला क्लिक करताच शिक्षिकेचा मोबाईल हॅक झाला आणि त्या मोबाईलचा अॅक्सेस दुसऱ्या मोबाईलवर गेला. आपल्या मोबाईलवर येत असलेले ओटीपी दुसऱ्या क्रमांकावर जात असल्याचे शिक्षिकेच्या लक्षात आले. त्यावेळी शिक्षीकेने त्यांच्या बँक खात्यातील १ लाख रुपये दुसऱ्या बँक खात्यावर ट्रान्सफर करुन घेतले. त्यामुळे त्यांचे एक लाख रुपयांची रोकड वाचली.पहिल्या खात्यावरून १ लाख १७ हजार रुपये दुसऱ्याच्या खात्यावर गेल्याचे त्यांना मेसेज आले. तसेच क्रेडीट कार्डवरून ५४ हजार ८९० रुपये वळविल्याचेही लक्षात आले. त्यांनी बँकेत चौकशी केली असता त्यांचा मोबाईल हॅक होऊन खात्यातून रक्कम वळविण्यात आल्याचे त्यांना समजले.
बँकेत तक्रार केल्याने १२० दिवसात तपास करून असे त्यांना सांगण्यात आले. या विषयी त्यांनी सायबर पोर्टलवरदेखील तक्रार केली. ही रक्कम गोठविण्यात येऊन परत मिळेल, अशी अपेक्षा शिक्षिकेला होती. मात्र कोणतीच रक्कम गोठविण्यात आली नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.