गाजीपूर (उत्तर प्रदेश) – जन्म आणि मृत्यू हा प्रकृतीचा नियम आहे. जन्मणाऱ्या प्रत्येकाला मरण अटळ आहे. मेल्यानंतर कोणीही परत येत नाही असं म्हणतात. पण अगदी या उलट एक भयानक, काळजाचं पाणी करणारी घटना समोर आली आहे. गावात एकच खळबळ उडाली जेव्हा मृत्यूच्या 4 वर्षांनंतर एक महिला पुन्हा आपल्या घरी परतली. खरंतर महिलेला जिवंत पाहिल्यानंतर कुटुंबियांची आणि गावकऱ्यांची झोपच उडाली. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेवर कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले होते. तिच्या अकाली जाण्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. पण मृत्यूच्या 4 वर्षानंतर महिला तिच्या लहान मुलीसोबत जिवंत घरी परतली. जेव्हा तिने संपूर्ण घटना कुटुंबाला सांगितली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये समोर आला आहे. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तब्बल 4 वर्षांआधीची आहे. महिला विवाहित आहे. तिला एक लहान मुलगीदेखील आहे. उपचारादरम्यान, महिलेला तिच्या कथित काका आणि मावशीने बेशुद्ध करून चिमुकलीसह देहविक्रीसाठी नेलं. तिथेही महिलेला 2 वेळा खरेदी आणि विकलं गेलं. पण यादरम्यान, एका व्यक्तीच्या मदतीने महिला तिच्या गावी सुखरूप परतली.
महिलेच्या चुलत भावाने सांगितलं की, आम्ही सगळ्यांनी ताईचा खूप शोध घेतला. पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे मृत्यू झाल्याचं समजत आम्ही तिचा पुतळा तयार केला आणि अंत्यसंस्कार केले. या दुःखात वडिलांचाही मृत्यू झाला. आईलाही गमवावं लागलं. सध्या घरी चुलत भाऊ, बहिण आणि त्यांचं कुटुंब राहतं.
महिलेने सांगितलेल्या घटनेनंतर पोलिसांनाही मोठा धक्का बसला. पोलिसांनी आरोपी काका आणि मावशीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.