आयटीआय परिसरात चार चायनीज हातगाड्यांना आग

पहाटेची घटना; चार व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील शासकीय आयटीआय मुलींच्या वस्तीगृहालगत रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या चार चायनीज हातगाड्यांना सोमवारी (दि. १९ जानेवारी) पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. या आगीत हातगाड्यांवरील कच्चा माल, गॅस शेगड्या, टेबल, खुर्च्या आदी साहित्य जळून खाक झाले असून, गरीब व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहावर मोठा घाला आला आहे.
दि. १९ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ३ वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे विघ्नेश नाईक यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. आयटीआय मुलींच्या वस्तीगृहाच्या बाजूला असलेल्या चार चायनीज दुकानांना आग लागल्याचे निदर्शनास आले.
या आगीत दिनेश जाधव, विजय सोनार , चंद्रकांत सोनार आणि मुस्कान टायर या चार हातगाडी मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
परिसरातून धुराचे लोट उठताना पाहून नागरिकांनी धाव घेतली. महापालिकेच्या अग्निशमन दलातील वाहन चालक व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी देविदास सुरवाडे, संतोष तायडे, वृषभ सुरवाडे, योगेश पाटील, विठ्ठल पाटील आणि चेतन सपकाळे यांनी आग विझवण्याच्या कामात मोलाची मदत केली.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पीडित व्यावसायिकांनी हा प्रकार टवाळखोरांनी मुद्दाम केल्याचा संशय व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात यापूर्वीही दोन ते तीन वेळा अशाच प्रकारच्या आगीच्या घटना घडल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे घातपाताचा संशय अधिक बळावला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी व्यावसायिक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.









