वाहन भरून आले हल्लेखोर : जखमींची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातच शुक्रवारी १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता महिला दक्षता समितीच्या कार्यालयातच तारखेवर आलेल्या पत्नीच्या माहेरच्यांना पतीच्या नातेवाईकांनी चक्क फायटर, दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामुळे जिल्ह्यात कायद्याचा धाक संपला काय असा सवाल उपस्थित झाला आहे.
संतोषगिरी उत्तमगिरी गोसावी (वय ३३), मनोज बाजीराव गोसावी (वय ४१) हे दोघे फायटर डोक्यात बसल्याने जबर जखमी झाले आहे. तर बरखा गणेश गिरी गोसावी (वय २०), ललिता मनोज गोसावी (वय ४५) यांनाही लाथाबुक्के व दगडांनी मारहाण झाली आहे. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांच्या पथकाने उपचार केले.
जखमींनि दिलेल्या माहितीनुसार, वाकोद ता. जामनेर येथील माहेर असलेले बरखा गोसावी यांना पती गणेश गिरी गोसावी त्रास देत असल्याने त्या माहेरी होत्या. तडजोड करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला दक्षता समितीच्या कार्यालयात पोलिसांनी बरखा हिच्या माहेर व सासरच्यांना बोलावले होते. येथे बरखा यांचे पती गणेश, सासू चंद्रा गोसावी, मावससासू निर्मला गोसावी, शिवा गोसावी, गजू गोसावी आणि अन्य मंडळी पैठण जी. औरंगाबाद व भोकरदन जी. जालना येथून आले होते. चर्चा सुरु असताना अचानक गणेशगिरी व त्यांच्या नातेवाईकांनी खिशातून फायटर काढत चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयातच गुंडगिरी करीत संतोषगिरी व मनोज यांच्या डोक्यात फायटर मारले. तसेच इतर महिलांनी देखील दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याबाबतचे विडिओ देखील पोलिसांनी केल्याचे तसेच सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद झाल्याचे जखमींनि सांगितले. या घटनेमुळे पोलीस विडिओ काढत राहिले व जखमी मार खात राहिले असे दिसून येत आहे. तसेच कार्यालयाच्या बाहेर चक्क वाहन भरून आणखी २० ते २५ जण पतीच्या घरच्यांनी आणले होते, असेही त्यांनी सांगितले. यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.