फुकट मद्य न दिल्याने टोळक्याचा धिंगाणा : साडेचार लाख रुपये लुटले
जळगाव (प्रतिनिधी) : फुकट बियर न दिल्यामुळे तीन जणांनी बियरबारवर दगडफेक करीत गल्ल्यातून साडेचार ते पाच लाख रुपयांची रोकड जबरीने हिसकावून नेल्याची घटना रविवारी दि. १५ सप्टेंबर रोजी रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील गुजराल पेट्रोलपंपाशेजारील बारमध्ये घडली. यावेळी माजी सैनिकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्यांना गंभीर जखमी करीत हल्लेखोर पसार झाले.
राष्ट्रीय महामार्गावर गुजराल पेट्रोलपंपाशेजारील कॉम्पलेक्समध्ये असलेल्या एन. एन. बियरबारमध्ये रविवारी रात्री तीन जण आले. त्यांनी मॅनेजरला पाच बियर फुकट मागितल्या. परंतु मॅनेजरने त्यांना बियर देण्यास नकार दिल्याने तिघांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेथे बसलेल्या ग्राहकांना दमदाटी करीत ते थेट पैसे ठेवलेल्या ठिकाणी शिरले.
दोघांनी माजी सैनिकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. तसेच बारमधील गल्ल्यातून साडेचार लाख रुपयांची रोकड लुटून नेली. एवढी प्रचंड धावपळ झाली. पोलिसांना माहिती मिळाली मात्र तोवर टोळक्याने हैदोस घालून फरार झाले होते. याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.जिल्हा पेठ पोलिस ठाण्यासमोरील एका बियरबारमध्ये गोळी झाडल्याची घटना ताजी असताना याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.