आयुक्तांनाहि दिले निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील काही भागांमध्ये अघोषित “नो हॉकर्स झोन” झाल्यामुळे हॉकर्स बांधवानी सोमवारी महानगरपालिकेसमोर धरणे देऊन घोषणाबाजी केली. तसेच, मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
शास्त्री टॉवर चौक ते महाबळ रोड, स्टेशन रोड ते चित्रा चौक, चित्रा चौक ते पांडे चौक, पांडे चौक ते सिंधी कॉलनी, पांडे चौक ते महाबळ येथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून हॉकर्सला व्यवसायासाठी मनाई सांगितली आहे. हा ’नो हॉकर्स झोन’ चा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी जळगाव शहर हॉकर्स टपरीधारक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भांतील निवेदन सोमवारी मनपा आयुक्तांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मनपाने जाहीर केलेल्या मार्गावर कोणत्याही प्रकारच्या हॉकर्सला, वाहतुकीला अडथळ्याच्या नावावर व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आले आहे. तसेच महासभेत आपण दंडात्मक कारवाईचा जो महासभेत पारित केलेला ठराव आपण रद्द करणार आहात.
परंतु, यात जळगाव शहर नगर पथ विके्रता समिती व हॉकर्स संघटनेला विश्र्वासात न घेता महासभेत जो निर्णय घेतला व ठराव केला त्यास आमचा तीव्र विरोध आहे. ही समिती केंद्र शासन व राज्य शासनाच्या आदेशानुसार गठित करण्यात आलेली आहे. तरी महासभेत केलेला ठराव रद्द करून हॉकर्स बांधवांना व्यवसाय करू देणे व जोपर्यंत राष्ट्रीय फेरीवाला समिती धोरण जळगाव शहरामध्ये लागू होऊन हॉकर्स झोन आखून देत नाही तोपर्यंत कारवाई थांबविण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदन देताना मोहन तिवारी, सुनील जाधव, दिनेश हिंगणे, राजेंद्र चौधरी, संजय सोनार, प्रदीप पवार, कैलास तिवारी, सुनील सोनर, मांगीलाल प्रजापती यांच्यासह मोठ्या प्रमाणात हॉकर्स बांधव उपस्थित होते.