मुक्ताईनगर येथील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : फेसबुकवर केलेल्या कॉमेंटवरून मोबाईल क्रमांकावर फोन करून धमकावल्याप्रकरणी एकाच्याविरूध्द मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर पोलीस स्थानकात विनोद दयाराम वानखेडे (रा. अंतुर्ली, हल्ली मुक्काम गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा ) यांनी तक्रार दिली आहे. यानुसार, विनोद वानखेडे यांनी फेसबुक पोस्टवरून केलेल्या कॉमेंटच्या संदर्भात बबलू उर्फ लक्ष्मण रमेश सापधरे (रा. मुक्ताईनगर) यांनी २१ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजून 43 मिनिटांनी कॉल केला. याप्रसंगी त्यांनी फेसबुकवरील कॉमेंटचा संदर्भ घेत विनोद वानखेडे यांना धमकावले.
बबलू सापधरे यांनी वानखेडे यांना धमकावतांना रिकामे काम करू नको असे सांगत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच यासोबत, ग्रुपमधील अन्य लोकांच्या मोबाईलवरून देखील आपल्याला धमक्या आल्याचे विनोद वानखेडे यांनी या तक्रारीत नमूद केले आहे. यानुसार, बबलू उर्फ लक्ष्मण रमेश सापधरे यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ लिलाधर भोई हे करत आहेत.