भुसावळ शहरातील शिरपूर कन्हाळे रस्त्यावरील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील श्रीगणेश प्लाझा, शिवपूर कन्हाळा रोड येथील एका अपार्टमेंटमध्ये लसण फटाक्याच्या किरकोळ वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. याप्रकरणी एकमेकांविरुद्ध शिवीगाळ, धमकी आणि मारहाणीच्या परस्पर तक्रारी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

पहिली फिर्याद रेखा योगेश बाविस्कर (वय ४५) यांनी दिली आहे. त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, २० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्यांच्या लहान मुलाने अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये फटाका फोडल्यामुळे शेजारी शिवाजी जाधव यांनी अपार्टमेंटच्या व्हॉट्सअॅप गटात अपशब्द वापरले. त्यानंतर त्यांनी व त्यांचा मुलगा महेंद्र जाधव यांनी त्यांच्या दारावर लाथा मारून धमकावले. अश्लील शिवीगाळ केली व चप्पल फेकून मारली, तसेच ‘आज तुला जिवंत ठेवत नाही’ अशा धमक्या दिल्या, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, घटनेच्या दुसऱ्या दिवशी शिवाजी रमेश जाधव (वय ५४) यांनी प्रत्युत्तर तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्यांच्या गाडीवर फटाका फोडल्याने त्यांनी चौकशी केली असता योगेश बाविस्कर व पत्नी रेखा बाविस्कर यांनी त्यांना शिवीगाळ केली. योगेश बाविस्कर यांनी चप्पल-बुटांनी मारहाण केली व ‘मी न्यायालयात काम करतो, तुला खोट्या गुन्ह्यात फसवीन’ अशी धमकी दिली, असा आरोप जाधव यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे. या दोन्ही प्रकरणांबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. पुढील तपास हे.कॉ. जितेंद्र पाटील करीत आहे.









