जळगाव ( प्रतिनिधी ) – दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाके फोडण्यावरून झालेल्या किरकोळ वादाने घेतले उग्र रूप, चौघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील प्रेमनगर परिसरात घडली. या प्रकरणी अश्विन पुरुषोत्तम धामोडे (वय ३८, रा. प्रेमनगर) यांनी शुक्रवारी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमा एजंट म्हणून काम करणारे अश्विन धामोडे हे दिवाळीनिमित्त घरी आलेल्या आपल्या भावासोबत लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाके फोडत होते. यावेळी शेजारी राहणारे किशोर मधुकर पाटील यांनी फटाक्यामुळे त्यांच्या आईला इजा झाली असती, असा आरोप करत वाद घातला. माफी मागूनही व पाटील यांच्या आईने समजावूनही वाद शांत झाला नाही. रात्री साडेदहाच्या सुमारास धामोडे कुटुंबीय घरात जात असताना किशोर पाटील, दिलीप मधुकर पाटील, त्यांचा मुलगा मितेश दिलीप पाटील आणि एका अनोळखी युवकाने मिळून सचिन धामोडे यांना अडवले. “आज तुझा हिशोब करून टाकतो” अशी धमकी देत त्यांनी वडिलांना शिवीगाळ करून ढकलले.
वाद वाढू नये म्हणून अश्विन धामोडे यांनी भावाला घरात पाठवले, मात्र चौघांनी अश्विन यांना रोखून बेदम मारहाण केली. मितेश पाटील यांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरड ऐकून शेजारी बाहेर पडताच चौघे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
अश्विन धामोडे यांनी उपचार घेतल्यानंतर अखेर शुक्रवारी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात किशोर पाटील, दिलीप पाटील, मितेश पाटील आणि एका अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.









