पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांची माहिती
संतकुमार कृपाराम उईके यांना १९ जुलै ते २६ सप्टेंबर या काळात अंकित अग्रवाल, मीरा यांनी त्यांच्याशी संपर्क करून शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्यासाठी वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड केले व त्यांना ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. संतकुमार उईके यांनी सुरुवातीला जे पैसे भरले होते त्यावर काही नफा दिला. मात्र नंतर विविध खात्यांवर १ कोटी ६ लाख ५ हजार ९८५ रुपये नेट बँकिंग द्वारे घेतले. मात्र त्यावर कोणताही परतावा दिला नाही. यामुळे सप्टेंबर महिन्यात सायबर क्राईमला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे, हेमंत महाडिक, सचिन सोनवणे यांनी ज्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते त्यापैकी युको बँक, गुजरात, आंध्र प्रदेश येथील बँक खाते तात्काळ गोठविण्यात आले. त्यामध्ये ५२ लाख ४७ हजार रुपये न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी संतकुमार उईके यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. तरी या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.