जळगाव एलसीबीची कामगिरी : भुसावळ येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- फायनान्स कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने भुसावळ येथील एका इसमाने दुचाकी विक्री करणाऱ्या एजंटला हाताशी धरून यावल तालुक्यातील व्यक्तीला दुचाकी विकली आणि दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल केली. मात्र जळगाव एलसीबीने कसून तपास करून या त्रिकुटाच्या कटाचा पर्दाफाश करीत तिघांना अटक केली आहे.
दि. २४ जून २०२५ रोजी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना संशयित आरोपी अशोक हिरामण मोरे (रा. दगडी मनवेल, ता. यावल) याच्याकडे चोरीची मोटारसायकल असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पोहेकॉ प्रीतमकुमार पितांबर पाटील, पोहेकॉ यशवंत टहाकळे, पोकॉ बबन पाटील आणि पोकॉ प्रदीप सपकाळे यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.(केसीएन)पोलिसांनी अशोक मोरे याला त्याच्या ताब्यात असलेल्या बजाज कंपनीच्या मोटारसायकल (क्र. महाराष्ट्र १९/सीसी ६६४०) सह चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथे आणले. कसून चौकशी केली असता मोरेने धक्कादायक खुलासे केले. त्याने सांगितले की, सुमारे ५ वर्षांपूर्वी रावेर येथील जुन्या वाहन खरेदी-विक्रीचा एजंट जफर शेख उस्मान (ह.मु. जाम मोहल्ला, भुसावळ) याच्यामार्फत त्याने प्रमोद निलेश कोळी (रा. हुडको कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ) यांच्या मालकीची मोटारसायकल १६,०००/- रुपये रोख देऊन विकत घेतली होती.
या व्यवहारावेळी तिघांमध्ये एक ठरलेला कट होता. त्यानुसार, ही मोटारसायकल प्रमोद निलेश कोळी याने बजाज फायनान्सकडून कर्ज घेऊन घेतली होती आणि तिचे हप्ते बाकी होते. महत्त्वाचे म्हणजे, या मोटारसायकलला महाराष्ट्र १९/सीसी ६६४० असा दुसरा आरटीओ क्रमांक लावला होता आणि प्रमोद निलेश कोळी ही मोटारसायकल चोरीला गेल्याची पोलिसांत खोटी तक्रार देणार होता. या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात एजंट जफर शेख उस्मानने कमिशन म्हणून २,०००/- रुपये घेतले होते. सदर मोटारसायकलचा मूळ आरटीओ क्रमांक (एमएच १९/डीके ०७५५) असा खरा आहे. प्रमोद निलेश कोळी याने या मोटारसायकल चोरीची भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती आणि त्यानुसार ३० डिसेंबर २०१९ रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सखोल तपासानंतर हे स्पष्ट झाले की, संशयित आरोपींनी बजाज फायनान्स कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने मोटारसायकल चोरीचा हा संपूर्ण बनाव रचला होता. पोलिसांनी तात्काळ या कटातील तिन्ही आरोपींना अटक केली आहे. यात मोटारसायकल विकत घेणारा अशोक हिरामण मोरे (वय ३९, रा. दगडी मनवेल, ता. यावल), मोटारसायकल खरेदी-विक्री करणारा एजंट जफर शेख उस्मान (वय ३४, रा. रावेर, ता. रावेर ह.मु. जाम मोहल्ला, भुसावळ), बनावट फिर्याद देणारा प्रमोद निलेश कोळी (वय ३७, रा. हुडको कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ) यांचेसह जप्त केलेली मोटारसायकल पुढील कार्यवाहीसाठी भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे.(केसीएन)या यशस्वी कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न कौतुकास्पद ठरले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रीतमकुमार पाटील, पोहेकॉ यशवंत टहाकळे, पोकॉ बबन पाटील आणि पोकॉ प्रदीप सपकाळे यांनी पार पाडली.