माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलचे लोकार्पण
जामनेर / जळगाव (प्रतिनिधी) : मोठ्या शहरांमध्ये असलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आता जामनेर शहरात मिळणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा ग्लोबल हॉस्पिटलच्या माध्यमातून माजी मंत्री तथा आ. गिरीश महाजन यांनी दिला आहे. त्यामुळे गरीब,श्रीमंत सर्वच रुग्णांना सवलतीच्या दरात तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळणार आहेत. त्याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल व नर्सिंग होमचा मंगळवारी १३ ऑक्टोबर रोजी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हस्ते जामनेर येथे शुभारंभ झाला. जीएम डायग्नॉसिस सेंटरचेही त्यांनी व्हर्च्युअल उदघाटन केले. कार्यक्रमाला माजी मंत्री गिरीश महाजन, खा. डॉ. सुभाष भामरे, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, आ. किशोर पाटील, आ. चंदुलाल पटेल, माजी आ. स्मिता वाघ, जळगावच्या महापौर भारती सोनवणे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन, आणि अन्य नेते उपस्थित होते.
जीएम डायग्नॉसिस सेंटरचे व्हर्च्युअल उदघाटन
यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, कोरोनाच्या काळात जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक रुग्णांना दाखल करण्यापासून, त्यांचे जेवण, उपचार करण्यापासून त्यांना बरे करून घरी पाठविण्याचे काम केले आहे. ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक नामांकित डॉक्टर्स जोडले गेले असून गुंतागुंतीच्या शस्त्रकियासाठी त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. जळगावातच नागरिकांना मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मेट्रो सिटीची सेवा मिळणार असेल तर का जायचे मुंबई ? असे म्हणत गिरीश महाजन यांनी सर्व वर्गासाठी वैद्यकीय सुविधा सवलतीच्या दरात ग्लोबल हॉस्पिटल येथे उपलब्ध राहतील असे सांगितले.
यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रूग्णांना कमी दरात रूग्णसेवा मिळावी, याचा ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलच्या माध्यमातून आवर्जून प्रयत्न करण्यात आला आहे. गरिबांच्या सेवेसाठी अनेक योजना गिरीश महाजन यांनी आणल्या आहेत. त्यामुळे सर्वांसाठी हक्काचे एक रूग्णालय सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. राज्याची आरोग्य सेवा तोकडी, हे कोरोनामुळे सर्वांच्या लक्षात आले आहे. राज्य सरकार असो की, खाजगी क्षेत्र सर्वच क्षेत्रात हे आव्हान आहे. आज १५ लाखांवर रूग्ण आणि ४० हजारावर मृत्यू ही कोरोनाची स्थिती भयावह आहे. याठिकाणी अतिशय कमी वेळात कोरोना वॉर्ड तयार झाला, हे अभिनंदनीय आहे. आपल्या सरकारच्या काळात आरोग्य शिबिरांतून अनेकांना लाभ झाला. असेच काम यापुढेही गिरीश महाजन यांच्याहस्ते होत रहावे, अशा मी त्यांना शुभेच्छा देतो, असेही फडणवीस म्हणाले.
गिरीश महाजन यांच्याकडे पाहिले कि त्यांच्या वयाचा अंदाज येत नाही, ते चिरतरुण आहेत. कारण त्यांच्या हस्ते रुग्णसेवा झालेल्या अनेक रुग्णांचे त्यांना आशीर्वाद लाभले आहे, म्हणूनच ते चिरतरुण आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हॉस्पिटलचे आरोग्यदूत रामेश्वर नाईक, अरविंद देशमुख, पितांबर भावसार, चंद्रकांत बावसकर, जितेंद्र पाटील, रवींद्र झाल्टे, दीपक तायडे, सुभाष पवार, सुहास पाटील आदींच्या नेतृत्वाखाली जीएम फाउंडेशनच्या व ग्लोबल हॉस्पिटलच्या स्टाफने परिश्रम घेतले.