मुंबई ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीने तिकीट दरात 17 टक्क्यांनी वाढ केली आहे. या तिकीटवाढीमुळे आता एसटीचा प्रवास महागणार असून आज मध्यरात्रीपासूनच नवे दर लागू होतील.
काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ वाढ झाली. इंधन महागल्यामुळे आर्थिक गणितं जुळवताना एसटी महामंडळाची दमछाक होत होती. दीपावलीसाठी चाकरमाने शहरातून गावी जातात. प्रवाशांची मोठी गर्दी असते. असे असतानाही एसटीच्या तिकीट दरात तब्बल 17 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
एसटीची यापुर्वीची भाडेवाढ जून 2018 मध्ये झाली होती. दरवाढीनंतर दोन वर्षात डिझेलच्या दरात 25 रुपये वाढ झालीय. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचा डोलारा सांभाळण्यासाठी भाडेवाढीचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी भाडेवाढीसाठी राज्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय परिवहन समिती तयार करण्यात आली होती. समितीचा अहवाल महामंडळाच्या संचालक मंडळासमोर सादर करण्यात आला. एसटीला आतापर्यंत 12500 कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे. कोट्यवधांची देणी शिल्लक आहेत. डिझेल दरात सातत्याने वाढ होत असल्याने खर्चात वाढ झाली आहे. कोरोनाकाळात प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे 12 तास काम करूनही कर्मचाऱ्यांचे वेतन अनेकदा रखडले आहे. या सर्व अडचणीतून बाहेर येण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्यात आलीय.