जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल येथील भूमिअभिलेख कार्यालयातील प्रमुख भूमापक संजय नामदेव पाटील ( वय ५२ ) यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे . त्यांचा वरिष्ठांसह सहकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनीही केला आहे . काही लोकांच्या नावांसह लिहिलेली चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली आहे .
प्रमुख भूमापक पदावर त्यांची नियुक्ती २०१९ सालात करण्यात आली होती . त्यांचे कुटुंब चाळीसगावात राहते . गेल्या सोमवारी ते कार्यालयातच मुक्कामी थांबले होते . मंगळवारी सकाळी कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला जात नसल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेंव्हा त्यांना संजय पाटील बेशुद्धावस्थेत दिसले . या कर्मचाऱ्यांनी त्यांना आधी स्थानिक सरकारी रुग्णालयात आणि नंतर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले होते . सध्या त्यांच्यावर जळगावात खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत . या कार्यालयातील कर्मचारी संजीव माळी यांनी या प्रकाराची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली होती , असे त्यांचा मुलगा प्रशांत पाटील याने सांगितले . खाजगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ईसीजीसाठी त्यांचे कपडे काढले तेंव्हा त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली होती .
या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे की , त्यांच्या नियुक्तीपूर्वी प्रमुख भूमापक पदावर आर एस जाधव होते . सोनवणे यांनी डाटा एंट्री केली नाही . डाटा एंट्रीचा सरकारकडून मिळणार मोबदला सोनवणे आणि जाधव यांनी वाटून घेतला . व्ही एल पाटील यांनी मोजणीचे काम दुसर्याकडून डीएससी करून घेतली . मोजणीला संजय पाटील यांना पाठवले जात होते . या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे .
याबद्दल एरंडोलचे प्रभारी उप अधीक्षक विजय देवरे यांनी सांगितले की एरंडोलचे उप अधीक्षक व्ही एल पाटील १२ नोव्हेंबरपासून रजेवर आहेत त्यांचा प्रभारी पदभार माझ्याकडे आहे संजय पाटील यांच्या आरोपांबाबत मला काहीही माहिती नाही .