एरंडोल तालुक्यातील खेडगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील खेडगाव येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात विषारी औषध सेवन केल्याची घटना शनिवारी दिनांक १५ जून रोजी दुपारी २ वाजता घडली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असतांना मंगळवाारी दिनांक १८ जून रोजी मध्यरात्री २ वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
किसन मोरसिंग राठोड (वय ४६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. किसन राठोड हे पत्नी, दोन मुले यांच्यासह एरंडोल तालुक्यातील खेडगाव येथे वास्तव्याला होते. शेती करून ते उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्याच्या विवंचनेत ते होते. अखेर कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी राहत्या घरी शनिवारी दिनांक १५ जून रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरी विषारी औषध सेवन केले.
त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी खासगी वाहनाने तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी दिनांक १८ जून रोजी मध्यरात्री २ वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूची वार्ता कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. याबाबत जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.