लाचलुचपत खात्याच्या चौकशीचा फास आवळला जाणार ?
जळगाव – मद्यतस्करीत सहभाग असल्याच्या संशयाने गोत्यात आलेले एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी कुजबूज आता पोलिस खात्यातही सुरू झालेली आहेे . या पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचा़र्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर खाकी डागाळली असून लॉकडाऊन काळात मद्याची तस्करी करणे त्यांना भोवले आहे. कोरोना संकटाचे गांभीर्य नसणार्या असंवेदनशील व्यक्ती म्हणून संवेदनशीलतेने कर्तव्य न बजावता पैसे कमाविण्याचा गोरखधंदा या खाकी वर्दीवाल्यानी केल्याने समाजमनात संताप व्यक्त होणे साहजिक आहे . या सर्व आरोपी पोलिसांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी व्हावी कारण संबंधित पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी लॉकडाऊनच्या काळात दारूधंद्यात भागीदारी केल्याची बाब समोर आली आहे! इतकेच नाही तर आणखीही या संबंधित पोलिसांचे कारनामे उघड होतील. अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिका़र्यांची मद्य विक्रेत्या व्यक्तींशी भागीदारी असल्याची काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी झाल्यास अपसंपदेची प्रकरणे समोर येण्याची शक्यताही आहे.
मद्यतस्करीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांची शुक्रवारी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी तडकाफडकी बदली मुख्यालयात केली असून एमआयडीसी पोलिस ठाण्याचा पदभार तात्पुरत्या काळासाठी शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
मद्याचे गोदाम व दुकानाच्या मालकाच्या संपर्कात राहून या पोलिस निरीक्षकाने व अन्य कर्मचार्यांनी मद्यतस्करीचे नियोजन केलेले असल्याचे स्पष्ट करणारे मोबाईल कॉल्स विशेष तपास पथकाच्या हाती लागलेले होते. त्या कॉल डीटेल्सच्या आधारावर व लॉकडाऊन काळासह आधीपासूनच्या काळातील बँकेतील व्यवहारांचीही माहिती घेऊन विशेष तपास पथकाने त्यांचा चौकशीचा अहवाल तयार केलेला असल्याचे समजते.
शुक्रवारी पोलिस निरीक्षक शिरसाठ यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. उर्वरित चारही कर्मचार्यांवरदेखील कारवाईचे संकेत डॉ. उगले यांनी दिले असले तरी या सर्वांची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या पोलीस निरीक्षकासह चारही कर्मचार्यांची सखोल चौकशी करण्यात येत असून लवकरच सर्वांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी आज स्पष्ट केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही जणांचे शुक्रवारी आवाजाचे नमुने घेऊन पडताळणीसाठी मुंबईला प्रयोगशाळेत पाठवले गेले आहेत.
दरम्यान, मद्यतस्कर पोलिस अधिकारी व कर्मचार्यांवरील अंतिम कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आज सायंकाळपर्यंत हा अंतिम अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला जाणार असल्याचे समजते. त्यावर पोलिस अधीक्षक कोणत्या कारवाईचा निर्णय घेतात , याबद्दल पोलिस खात्यात कमालीची उत्सुकता वाढलेली आहे.पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी यवतमाळ , मुंबई येथे सेवा बजावली असल्याचे समजते