जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा दूध संघाला सध्या २५ कोटी रुपयांचा वार्षिक नफा होतो आहे . स्वतःच्या ठेवी ३७ कोटी रुपयांवर पोहचल्या आहेत अशी माहीती आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी आधुनिक प्रक्रिया यंत्रणा , पॅकिंग व दुग्ध जन्य पदार्थ निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन सोहळ्यात दिली . संचालक , सदस्यांच्या मेहनत आणि विश्वासावर दूध संघ विस्तारणार आहे असेही ते म्हणाले .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की , गेल्या ४३ वर्षांच्या कालखंडात मीपण दूध उत्पादक आहे , सगळी वस्तुस्थिती अनुभवतो आहे . मध्यंतरी आपल्या दूध संघाची परिस्थिती बिघडली होती . दूध संघ अवसायनात आला . याबद्दल मी अर्थमंत्री असताना जिल्ह्यातील नेते मला बोलत होते . मी वर्गीस कुरियन यांना भेटलो त्यांना विनंती केली . त्यांनतर पुन्हा चांगले दिवस आले निवडणूक झाली संचालक मंडळाने अपेक्षा पूर्ण केल्या . याचा आनंद आहे राज्यात आपण वरच्या क्रमांकावर जाऊ अशी आशा वाढली आहे दूध उत्पादकांनी आतापर्यंत मोलाचे सहकार्य केले . राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी हा दूध संघ आपला समजून चालवला , असेही ते म्हणाले.