सेवा, महसूल पंधरवाडासंदर्भात नियोजन बैठक
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मंगळवार, दि. २ सप्टेंबर रोजी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली सेवा पंधरवाडा व महसूल पंधरवाडा संदर्भात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल अनुपस्थित राहिल्याबाबत मंत्री खडसे यांनी नाराजी व्यक्त करीत नोटीस काढण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त प्रसार माध्यमांत झळकले होते. मात्र या प्रकरणाचा तपास केला असता, संबंधित बैठकीस उपस्थित राहण्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आलेलेच नसल्याची बाब समोर आली आहे.

जिल्हा परिषदेच्या इतर विभागप्रमुखांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते, परंतु सीईओ यांच्या बाबतीत असा कोणताही नामोल्लेख नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बैठकीच्या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल या रावेर येथे आयोजित जिल्हा परिषद आपल्या दारी तक्रार निवारण सभेत उपस्थित होत्या.