चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथील घटना
चोपडा ( प्रतिनिधी ) – येथील चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी लावण्यावरून दोन पोलिसांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावरण तुंबळ हाणामारी मध्ये झाले. यात दोघेही गंभीर जखमी झाले असून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

शशिकांत पारधी आणि राकेश पाटील असे दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोन्हीही चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गेल्या चार ते पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. काही महिन्यांपासून दोघांमध्ये धुसफुस सुरू आहे. शनिवारी रात्री ड्युटी लावण्यावरून दोघा पोलिसांमध्ये पुन्हा एकदा वाद झाले. वाद एवढा विकोपाला पोहोचला की दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याच्यावर चोपडा येथे उपचार सुरू आहेत.
तर राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला मार लागला असून फॅक्चर झाला असल्याची माहिती मिळाली आहे. राकेश पाटील यांच्यावर धुळे येथे उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान या धक्कादायक घटनेमुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली असून घटनेची ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी याबाबत माध्यमांना सविस्तर माहिती दिली. दोघांवर उपचार सुरू आहेत.









