भुसावळ तालुक्यातील दिपनगर प्रकल्प येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील थर्मल पावर प्लांट येथील ६६० मेगावॅट प्रकल्पात काम करीत असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दि. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला घटनेची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
राजेश्वर रामानंद मांझी (वय ३५, रा. बनकटा, जि. गोपालगंज, बिहार, हल्ली मु. दीपनगर, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. तर एक भाऊ विदेशात काम करीत आहे. (केसीएन)९ महिन्यांपूर्वी भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील थर्मल पॉवर प्लांट येथे ६६० मेगावाटच्या प्रकल्पामध्ये तो गावातील काही मजुरांसोबत कामाला आलेला होता. गुरुवारी दि.२४ ऑक्टोबर रोजी दुपारी प्रकल्पामध्ये तो काम करीत असताना दुसऱ्या मजल्यावरून खालून साहित्य दोरीने ओढत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली लोखंडी साहित्य असलेल्या ठिकाणी आपटला.
पाठीला, शरीराला जोरात मार लागल्यामुळे तसेच एक पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.(कैसीएन)त्या ठिकाणी उपचार सुरू असताना संध्याकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. यावेळी दीपनगर येथील मजुरांनी जळगाव येथील रुग्णालयात धावाधाव केली होती. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. घटनेची जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.